By विजय साखळकर

@maharashtracity

मस्ताननं ‘गोदी का चूहा’ हा किताब मुंबईच्या भूमिगत जगतात (Mumbai Underworld) संपादन केल्यानंतरच्या काळातला. अचानक एक सुवर्णसंधी त्याच्या आयुष्यात चालत आली. बाकीचे उद्योग सुरू ठेवून तो हा उद्योग करू शकत होता. त्यामुळे त्याला अधिक पैसा मिळणार होता. असल्या गोष्टींना त्याची तयारी होती.

मुंबईत त्या काळात हुसेन ताला नावाचा एक तस्कर राहत होता. तो अत्यंत पाॅवरफूल्ल होता. त्याच्या पदरी शेकडो ‘कॅरियर’ होते. कॅरियर (smuggling carrier) ही तस्करी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची जागा. त्या जागेचा आब प्रचंड होता.पैसा भरपूर. काम तस्करी माल मागणीनुसार शेटनं सांगितल्यानुसार त्या त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवायचा.

पण शेकडो कॅरियर हाताशी असूनही सध्या त्याचे सगळे कारभार डबघाईला आले होते. कारण पोलिस आणि कस्टम‌! (police and custom department) या दोनही यंत्रणांचे जाळे या हुसेन तालाचे साम्राज्य पार डबघाईला आणत होते. तालाचे सगळे कॅरियर्स रेकाॅर्डवर आले होते. गोदीत बराच माल पडला होता. पण तो सोडवित असताना त्याचे कॅरियर्स अडकत होते. त्यामुळे माल सोडवता येत नव्हता. त्यामुळे लाखो रूपयांचे दैनंदिन नुकसान होत होते.

त्याला नवीन कॅरियर्सची गरज होती, जे पोलिसांच्या आणि कस्टमच्या रेकाॅर्डवर नव्हते. त्याचा त्याच्या संपर्कातील माणसांकरवी शोध सुरू होता. कुणी तरी त्याला मस्तानचे नाव सुचवले‌. त्यानं मस्तानला भेटायला बैलावले.

मस्तानची आढीटेढी वाणी हुसेन ताला याला मनोरंजक वाटली. परिचय करून देणाऱ्याने मस्तानची ओळख ‘गोदी का चूहा अशी करून दिली. तालानं त्याला एक टेस्टिंग डिलिव्हरी दिली. माल गोदीतून बाहेर आणायचा होता. तिथं माल आणून दिला की काम संपलं.

मस्ताननं ते अगदी सहज पार पाडलं. ताला खुश झाला. कारण त्याचे अडकलेले लाखो रूपये या एका डिलिव्हरीनं सुटणार होते. मग तालाला मस्तानवर भरवसा निर्माण झाला. तो त्याचा जवळजवळ गंडाबंद शागिर्दच ठरला. त्याची गोदीतली अडलेली कामे मस्तान चुटकीसरशी सोडवत होता.

याच काळात हुसेन तालाच्या विरोधात कस्टम्स आणि पोलीस यंत्रणांनी मोहीम उघडली होती. पण त्यांना तालाचा माल बाहेर येतो कसा, याचा उलगडा काही होत नव्हता. मस्तान चलाख त्यानं आपल्या ट्रीक्स वापरल्या. तो बंदोबस्तावरच्या पोलिसांचा दोस्त बनला. त्या मिळणाऱ्या बिदागितले अर्धे पैसे त्यांना देऊ लागला. त्याच्या यशाचं गमक है होतं.

काही दिवसातच हुसेन तालाच्या मागचं शुक्लकाष्ट आणखी वाढत गेलं. अनेक ठिकाणी कायदेशीर कारवाईची सत्र सुरू झाली‌‌. ताला अगदी जेरीस आला.

वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या कोर्टात त्याला सतत खेटा घालणं भाग पडत असे. त्यातून एखादी निपटली जाण्याची शक्यता दिसू लागली की दुसरी केस टाकली जात असे. त्यामुळे अखेर सोनेतस्करीचा (Gold smuggling) व्यवसायच बंद करून टाकण्याचा निर्णय त्यानं घेतला. तसे त्यांने आपल्या शागिर्दाना कळवून टाकले. त्याचबरोबर त्याने दुबईच्या (Dubai) या व्यवसायातील संपर्काना कळवून टाकले. त्यामुळे काही दिवसातच त्याला भेटण्यासाठी लोकांची रिघ लागली.

त्याचा अख्खा दिवसच‌ त्या साऱ्यांच्या भेटीगाठीत जात असायचा. सगळे त्याचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण ताला कुणालाच दाद देत नव्हता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर या व्यवसायावर मक्तेदारी असणाऱ्या दुबईतील एका घराण्याचा मुख्य कर्ताधर्ता पुरुष खास हा तिढा सोडविण्यासाठी भारतात आला. त्यानं दोन- तीनदा हुसेन तालाच्या भेटीगाठी घेतल्या. आपला निर्णय बदलण्यासाठी त्यांनी हुसेन तालाला गळ घातली. पण त्यांनं नाकारलं. आता म्हातारपणात शांत जीवन जगायचं आहे, तेही दुबईत. असं सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला. तरीही त्यांनी गळ घातलीच, आम्हाला सक्षम माणूस द्या.

हे काम फार कर्मकठीण होतं. त्यानं सुचवलेली सर्व माणसं नाकारली गेली. अखेर त्यानं मस्तानचं नाव सुचविलं. दोघांच्या भेटी घडवून आणल्या. पण मस्तान (Haji Mastan) बोलायचं कसा? राहायचा कुठं? त्याची आर्थिक स्थिती काय? या प्रश्नांची टोटल त्यांच्या मनासारखी न लागल्यानं त्याला रिजेक्ट केलं गेलं. पण त्याचा विनोदी स्वभाव मात्र त्या मंडळींना आवडला व पुढच्या भेटीत तो जवळ असायला हवा, असं त्या लोकांनी तालाला सांगितलं.

(पुढील अंकी अंडरवर्ल्डमधील मस्तानचा प्रवेश)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here