@maharashtracity

शून्य प्रहर काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे मंत्र्यांकडे आग्रही मागणी

नवी दिल्ली: कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shiv Sena MP Dr Shrikant Shinde) यांनी सोमवारी संसद अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात कल्याण यार्ड पुनर्विकासाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. या कामासाठी लागणारा 800 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्या, अशी आग्रही मागणी डॉ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केली.

ठाण्यापुढील (Thane) रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा, याकरिता अनेक प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा मंजूर करुन घेतले. त्यापैकी कल्याण यार्ड पुनर्विकास (Remodeling of Kalyan Yard) हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी साधारणपणे ८०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या (Mumbai Urban Transport Project – MUTP) तिसऱ्या टप्प्यातील या कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. अद्यापी या प्रकल्पाचे कोणतेही काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले नाही.

लाखो रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या या प्रकल्पाचे काम निधीच्या अभावी सुरु होत नसल्याची माहिती सभागृहात देत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लवकरात लकवर निधीची उपलब्धता करावी. या प्रकल्पाचे काम वेळेच्या मर्यादेत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवून गतीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्री यांच्याकडे केली.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरील कल्याण स्थानक हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त जंक्शनांपैकी एक आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मिळून ७६० गाड्या दररोज कल्याण रेल्वे स्थानकात थांबतात.

क्रॉस ओव्हर आणि मर्यादित रेल्वे मार्गिकांमुळे गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा सुरू होण्यास बराच विलंब होतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

कल्याण यार्डच्या पुनर्विकासामुळे कल्याण जंक्शनची पुनर्बांधणी होणार असून या अंतर्गत नवीन रेल्वे मार्गिका तसेच अतिरिक्त ५ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून एकूण १२ प्लॅटफॉर्म होणार आहेत. रेल्वे माल वाहतूक सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी गाड्या यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे, याकडे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

भविष्यात प्रगत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह कल्याण स्थानकाचा विकासामुळे नागरिकांचा रेल्वे प्रवास सोयीस्कर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here