@maharashtracity

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाकडून (Mumbai fire brigade department) माटुंगा येथील साई सिद्धी या इमारतीत मॉक ड्रील (mock drill) सुरू असताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे सदाशिव धोंडिबा कर्वे (गंभीर जखमी), चंचल भीमराव पगारे व निवृत्ती सखाराम इंगवले हे तिघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईसारख्या शहरात नेहमीच कुठे ना कुठे आग लागणे, इमारत, घराचे बांधकाम, झाडे कोसळणे, नदी, समुद्र, तलावात कोणीतरी व्यक्ती पडून बुडणे, नाल्यात कोणीतरी पडणे आदींसारख्या दुर्घटना घडत असतात. अशा आपत्कालीन घटनेप्रसंगी घाबरून न जाता आपला व इतरांचा जीव कसा काय वाचवता येतो, याचे प्रशिक्षण अग्निशमन दलाकडून व पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून (disaster management) नागरिकांना देण्यात येते.

माटुंगा (पूर्व) येथील डाॅ. भाऊ दाजी लाड मार्गावरील साई सिद्धी या इमारतीमध्ये शनिवारी माॅक ड्रील सुरू होते. त्यावेळी अचानक पाण्याचा दाब वाढला आणि दोन गाड्यांपैकी एक गाडी पुढे सरकली व दुर्घटना घडली.

त्यामध्ये, वाहनचालक सदाशिव धोंडिबा कर्वे (गंभीर जखमी), चंचल भीमराव पगारे व निवृत्ती सखाराम इंगवले हे तिघेजण जखमी झाले. त्यांना तात्काळ सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना का व कशी काय घडली, त्यात नेमक्या काय चुका झाल्या याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here