By Sadanand Khopkar

@maharashtracity

कुसुमाग्रज नगरी, नाशिक – मराठी भाषेच्या (Marathi language) सर्वांगीण वृद्धीसाठी राज्य शासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन करताना लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांच्यासोबत चर्चा करू, असे प्रतिपादन खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी साहित्य संमेलन समारोप प्रसंगी केले.

पवार म्हणाले, मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला हवा. साहित्यिकांना विनंती आहे की, मराठी साहित्य नव्या पिढीपुढे पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) यांचे योगदान नाशिककर (Nashik) आणि महाराष्ट्र (Maharashtra) कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भगूर येथे जन्म घेतला. त्यांनी सुरू केलेल्या क्रांतीकार्यात अनेक क्रांतीकारक सहभागी झाले. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध येथेच केला. त्या भूमीत हे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्याचा आनंद आहे.

ते पुढे म्हणाले, मुघलांच्या काळात मराठी भाषेचा र्‍हास होत गेला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी फारशी भाषेचा (Farsi language) सुळसुळाट दूर केला. राजव्यवहार कोश निर्माण केला. मराठी भाषेचे स्वामित्व अबाधित रहायला हवे.

पवार म्हणाले, राजकारभारात मराठी आली. मात्र, आजही न्यायनिवाड्यामध्ये मराठीला स्थान नाही. इंग्रजानंतरही (British) मराठी भाषेचा प्रवास खडतर राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनी वर्ष १९६९ मध्ये मुबंई महाविद्यालयात मराठी भाषा विभाग स्थापन झाला. यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र मराठी भाषा संचलनालय चालू केले. आपल्या भाषेचा संवर्धनासाठी इतक्या वर्षांत काय झाले, याचा लेखाजोगा मांडला पाहिजे.’’

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शरद पवार यांनी सुचवलेल्या सूचना

१. परकीय भाषांचे अनेक शब्द मराठीत प्रवेश करत आहेत. मराठी भाषेचा शब्दकोश काळानुसार सुधारणे आवश्यक आहे.
२. बोली भाषेला मराठीत अधिकाधिक स्थान द्यायला हवे.
३. सोपी शब्द मराठी आले, तर भाषेची गोडी आणखी वाढेल.
४. पाठपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणण्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा मराठी मागे पडेल.
५. लहान मुलांना इंग्रजी आवश्यक आहे, या भूमिकेतून शालेय शिक्षणात इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. मराठी भाषेसाठी हा मोठा धोका आहे.
६. मराठी भाषेचा सुलभसंच विकसित करायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here