By Jitendra Awhad

@Awhadspeaks

बांद्रा येथील म्हाडाच्या (Mhada) मुख्य कार्यालयामधील कर्मचारी व अधिका-यांची काल (दिनांक ५ जुलै) भेट घेतली. म्हाडाचे काम गतीमान व्हावे यासाठी मागील अडीच वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय (policy decisions) घेतले. आपल्याला आश्चर्य वाटेल कि, मागच्या अडीच वर्षामध्ये म्हाडाच्या दर आठवड्याला आढावा बैठक होत असतं. एकूण बैठकींची संख्या ही जवळ-जवळ अडीचशेच्या पार झाली. या दरम्यान अनेक नवीन योजना आणल्या. 10 वर्षांत जेवढा अर्थसंचय झाला नव्हता त्याहून अधिक अर्थसंचय मागच्या दोन वर्षांत झाला. 10 वर्षांत जेवढी देकारपत्र देण्यात आली नव्हती ती मागच्या दोन वर्षांत देता आली. म्हाडाचा पुनर्विकास (redevelopment) गतीमान झाला.

त्यातूनच म्हा़डा केवळ घरबांधणीच्या क्षेत्रात नसून त्याची काही सामाजिक जबाबदारी आहे, याची देखील मी महाराष्ट्राला जाणीव करुन दिली. कोकणात तळीये (Taliye Village) गावामध्ये मागील वर्षी दरड कोसळून उडालेला हाहाकार, आणि म्हाडाने घेतलेला निर्णय कि, तळीये गावाचा विकास आम्ही करणार. हे म्हाडाचे सामाजिक भान दर्शवित होते. त्याचबरोबर कॅन्सर रुग्णांच्या (cancer patients) नातेवांईकांसाठी 100 खोल्या उपलब्ध करुन देणे, त्याही दादरमध्ये.

मुला-मुलींचे वसतिगृह, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह (working women hostel). तीन वेगवेगळ्या ठिकाणी Old age Home, बांद्रा येथे मुक्या प्राण्यांसाठी मोक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल, गोरेगाव येथे जवळ- जवळ अडीच एकर जागेवरती हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात. त्याचबरोबर त्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या भूखंडावर हॉस्पिटलशी संलग्न असे वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृह. यापुढे कोणाला मुंबईमधील Play Ground किंवा Recreational Ground द्यायचे नाही ते म्हाडाने स्वत: ठेवावे, विकसीत करावे व लोकोपयोगात आणावे हा निर्णय. म्हाडाच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या शोधून काढून म्हाडातर्फे संरक्षक भिंती बांधून कब्जात ठेवणे. अशा अनेक घोषणा झाल्या.

बीडीडी चाळ (BDD chawl) जी 30 वर्षे बंद होती त्याच्या कामाला सुरुवात झाली. पत्राचाळीच्या कामाला सुरुवात झाली. पहाडी गोरेगावचे काम बरेच पुढे गेले आहे. तिथे पत्रकारांना व चित्रपट सृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणा-यांना घरे द्यावीत ही माझी मनिषा होती. ते काम मी फक्त बोलून गेलो पण ते काम काही मी पूर्ण करु शकलो नाही. येणारे मंत्री ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

शीळ फाट्याजवळ असलेल्या आडवली गावातील 200 एकर जमिनीवर मोठे गृहनिर्माण संकुल तयार करावे यासाठी घेतलेला निर्णय. अशा अनेक योजना मी कार्यान्वित करु शकलो. त्या केवळ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे त्यांच्या सहकार्यामुळेच. त्यामुळे माझ्या मनाला तरी स्पष्टता आहे, कि माझी कारकिर्द मी यशस्वी करु शकलो. किती काळ मिळाला यापेक्षा मी निर्णय किती घेतले, कसे घेतले आणि त्याचे समाजावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचे आहे.

नाशिकमध्ये घरांमध्ये घोटाळा (Nashik housing scam) झाला आहे हे लक्षात येताच तेथे चौकशी लावली. फक्त 157 घरे म्हाडाने महानगरपालिकेकडून घेतली होती. परंतु चौकशी अंती आज जवळ- जवळ 5000 घरे म्हाडाला नाशिकमध्ये मिळणार आहेत. तसेच पुण्यामध्ये (Pune) हजारोने घरे आम्ही नागरिकांना देऊ शकलो. औरंगाबादमध्ये (Aurangabad) 4000 पेक्षा जास्त घरे आम्ही नागरिकांना देऊ शकलो. या सगळ्यामध्ये त्या- त्या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी काम करत होते. हे त्यांचे यश आहे. माझा फक्त हातभार लागला आहे. त्यामुळे मनात किंचीतही सत्ता गेल्याचे दु:ख नाही. जेव्हा सत्ता होती तेव्हा लोकोपयोगासाठी ती वापरली याचा आनंद आहे.

तुमच्यामुळेच माझा काळ स्मरणात राहील ही भावना व्यक्त करण्यासाठी काल म्हाडामधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले.

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here