@maharashtracity

बालरोग तज्ज्ञ कोरोना राज्य टास्क फोर्सची सुचना

मुंबई: मुलांना लस द्यायची की नाही या निर्णयाला विलंब होत आहे. लहान मुलांचा गट अद्याप लसीवाचून वंचित असून शाळा सुरु करण्यासारखे प्रश्न लस टोचण्यावर अवलंबून आहेत. असे असताना लहानग्यांच्या लसीकरण निर्णयाला विलंब होऊ नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ कोरोना राज्य टास्क फोर्सचे (corona task force) तज्ज्ञ देत आहेत.

पाचवीच्या पुढील वर्गांची शाळा सुरु झाली असून अर्धे वर्ग अजून बाकी आहेत. मात्र हा निर्णय १८ वर्षाखालील मुलांना लस टोचली नसल्याने बाजूला ठेवण्यात आला. तर पालकवर्ग मुलांना शाळेत पाठविण्यास उत्सुक असून त्याबाबत कधी निर्णय होईल याकडे या वर्गाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत शाळा सुरु कराव्यात असे मत बालरोग तज्ज्ञ कोरोना टास्क फोर्सकडून मांडण्यात आले. मात्र त्याचवेळी सुचना देवूनच शाळा सुरु कराव्यात असे सुचित केले असल्याचे बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

१२ ते १८ हा वयोगट फिरता असल्याने लस नसल्याने संसर्ग फैलावण्याची या वर्गाकडून शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मुलांना लस टोचणे आवश्यक आहे.

यावर बालरोग तज्ज्ञ कोरोना टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले की, सध्या लहान मुलांमध्ये बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी (herd immunity) निर्माण झाली आहे. त्यांना लस उपलब्ध नसली तरीही त्यांच्यात रोग प्रतिकार शक्ती तयार झाली. याचाच अर्थ त्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला असा आहे.

मुलांना मोठ्याप्रमाणे त्रास झाला नसेल किंवा नाही. तरीही त्यांना लसवंत करणे आवश्यक आहे. कारण काही मुलांना हा संसर्ग घातकी ठरु शकतो. मुलांना लस देण्याबाबत ट्रायल झाली असून लहान मुलांना लस देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा असेही सुचित करण्यात आले आहे.

दरम्यान, बोर्डींग स्कुल आणि दिव्यांग मुलांच्या शाळा सुरु कराव्यात का असे सरकारने बाल कोरोना टास्क फोर्सकडे विचारणा केली असता या ही शाळा सुरु कराव्यात अशी सुचना या टास्क फोर्स कडून करण्यात आली.

मात्र यासाठी काही विशेष काळजी घेण्यात याव्या असे ही सुचित करण्यात आले. बोर्डिंगस्कुल मधील मुलांना दाखल होण्यापूर्वी आरटीपीसीआर (RTPCR test) चाचणी करण्यात यावी. बाकी उर्वरित सुचना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांतीलच असल्याचे सांगण्यात आले.

मास्क, सोशल डिस्टसिंग आणि सॅनिटायझर, शिक्षकांचे लसीकरण अशा सारखे अनेक नियमांचे पालन शाळा सुरु करताना करण्यात येत आहेत. बोर्डिंग स्कुलसारख्या शाळा सुरु करा असे सांगून तीन आठवडे उलटून गेले. मात्र यावर निर्णय घेण्यास उशिर होत असल्याने नाराजी दिसून येत आहे.

दरम्यानच्या काळात दिवाळीच्या सुट्याही आल्या. तरीही शाळा सुरु करण्यावर सरकारही आग्रही आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी टास्क फोर्सचे बोलणे झाले असल्याचे सांगण्यात आले. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत निर्णय घेण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here