@maharashtracity

धुळे: राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील (medical college) स्थायी व अस्थायी वैद्यकीय अध्यापकांच्या (medical teachers) विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनतर्फे (MSMTA) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात असोसिएशनच्या धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. मुकर्रम खान, सचिव डॉ. योगेश बोरसे, डॉ. अमिता रानडे, डॉ. सारिका पाटील, डॉ. दीपक शेजवळ आदी अध्यापक सहभागी झाले होते.

याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऐच्छिक एनपीए व विविध भत्ते, वैद्यकीय अभ्यास, पदव्युत्तर भत्ता, जोखीम भत्ता, विशेष भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार एक जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीम लागू करावी, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेश करावे, प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी द्याव्यात.

करार पद्धतीवरील नियुक्तीचा आदेश रद्द करावा, सरळसेवा भरती प्रक्रियेत तात्पुरत्या वैद्यकीय प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात यावे, अध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, जनआरोग्य योजना प्रोत्साहन भत्त्याची अंमलबजावणी करावी, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग सचिवांना निलंबित करावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापकांनी तीन मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनांतर्गत आतापर्यंत काळा दिवस पाळणे, कँडल मार्च काढणे, वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर घंटानाद, अधिष्ठातांना घेराव आदींचा समावेश आहे. या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास गुरुवारी अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, शुक्रवारी घोषणा आंदोलन करण्यात येईल.

यानंतरही दखल न घेतल्यास 14 मार्चपासून अत्यावश्यक व कोविड रुग्णसेवा वगळता अन्य रुग्णसेवेसह पूर्ण काम बंद ठेवण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here