@maharashtracity

मुंबई: मशिदीवरील भोंगे उतरवले न गेल्यास हनुमान चालिसा वाचली जाईल, असे वक्तव्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या वक्तव्यावरून बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज यांच्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाला अटक करावी, याबाबत कायदा सांभाळणाऱ्यांच्या मनात संभ्रम नसावा, असे वक्तव्य करून सुजात आंबेडकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण झाल्यास थेट राज ठाकरे यांना अटक करा, असे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांचे सुपुत्र असलेले सुजात लंडनमधील रॉयल हॅलोवे युनिव्हर्सिटीमधून एमएससी इन इलेक्शन कॅम्पेनिंग ॲण्ड डेमोक्रसी याविषयात शिक्षण संपादन करून भारतात आले आहेत.

सुजात यांची पहिली राजकीय सभा राहुल नगर नंबर १ येथे पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्तार आणि विरोधक या सगळ्यांचा समाचार घेतला.

सुजात म्हणाले, अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकले, मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो. फक्त अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा. याकरिता एकही बहुजन माणूस नको, जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही.

सुजात आंबेडकर म्हणाले, माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती आहे, तुम्ही शरद पवारांची (Sharad Pawar) मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या. मात्र, तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणाऱ्या दंगलीवर उभा करू नका. कायदा सुव्यवस्था (Law and Order) सांभाळणाऱ्यांसमोर तुम्ही जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे दंगली झाल्या तर कोणाला अटक करावी, याबाबत संभ्रम नको.

येणारा काळ खूप अवघड आहे. आपल्याविरुद्ध खूप अपप्रचार केला जाणार आहे. निवडणूका जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा, रिसोर्सेस, ताकद नाही. मात्र, एक गोष्ट आहे ती म्हणजे जिद्द. तुमच्यातील जिद्द पक्षाची ऊर्जा म्हणून काम करणारी आहे. चुनाभट्टीमधील राहुल नगर नंबर १ कार्यालय उद्घाटन प्रसंगी सुजात आंबेडकर मुंबईत बोलत होते.

प्रस्थापित पक्ष हे सिंडिकेट राजकारण करून वंचित वर्गाला वंचितच ठेवण्यात धन्यता मनात आहे, असा आरोप करून सुजात आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र, पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

मागील दोन निवडणुकांमध्ये आपण बघितले की फक्त आपल्या समाजाच्या ताकदीवर आपण निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समजातील मतदाता जोडता आला पाहिजे. त्या परीने प्रयत्न करा. आपला समाज सोडून इतर समाजातील तीन व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचा मतदाता म्हणून तयार करा. पुढच्या निवडणुकीत अपयशाचं हे चित्र नक्की पालटलेलं असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुजात यांची मुंबईत झालेली ही रॅली आणि पहिली राजकीय सभा आगामी निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून महत्वाची समजली जाते.

बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू या नात्याने आंबेडकरी जनतेत असलेला उत्साह या निमित्ताने दिसून येत होता. लंडनवरून शिक्षण संपवून आलेले बाबासाहेब आम्ही पहिले नाहीत. मात्र, सुजात आंबेडकर यांना पाहून ती कसर देखील भरून निघाली असे भावनिक उद्गार तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here